Ad will apear here
Next
स्वल्पविराम...
मुक्त पत्रकार आणि अनुवादक देविदास देशपांडे यांचे भाषाविषयक सदर दर सोमवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होत होते. त्याचा समारोप करणारा हा लेख...
.........
‘बाइट्स ऑफ इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर गेली अडीच वर्षे सुरू असलेल्या या सदरात स्वल्पविराम घेण्याची वेळ आली आहे. संकेतस्थळाची फेररचना करण्याचे नियोजन असून, त्यानुसार काही बदल होणार आहेत, असे ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनी सांगितले. त्यामुळे, सध्या सुरू असलेल्या साप्ताहिक सदरांतर्गत वाचकांपुढे येणारा हा तूर्तास तरी शेवटचा लेख. 

भाषा हा माझा आवडीचा विषय. सुदैवाने पाच-सहा भाषांची मला माहिती असल्यामुळे विविध भाषक समाजात काय घडामोडी घडत आहेत, याचीही माहिती असते. तीच माहिती मराठी वाचकांपुढे मांडण्याचा यथाशक्य प्रयत्न मी केला. भाषेचे व्याकरण किंवा अन्य तांत्रिक अंगात न पडता तिच्या व्यावहारिक बाबींवर जास्त लक्ष केंद्रित करणे, यावर माझा पहिल्यापासून भर राहिला. वाचकांकडूनही त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आला. व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांतून या लेखांचा प्रसार झाला, त्यावर चर्चा झाली. लेखक म्हणून ही सगळी प्रक्रिया सुखावणारी होती. या सदराने मला खूप आनंद दिला. 

...मात्र हे सर्व सहजपणे घडले नाही. दर आठवड्याला भाषा विषयावर एखादी नवीन घडामोड शोधणे, तिचा अन्वयार्थ लावणे आणि ती लोकांसमोर मांडणे हे सोपे काम नव्हते. त्यातही लोकांना कंटाळा न येता त्याची मांडणी करणे हे तर महाकर्मकठीण! शिवाय एक समस्या अशीही होती, की आपल्याकडे इंग्रजी भाषेबाबत जेवढी जागृती आहे, तेवढी अन्य भाषांबाबत नाही. फ्रेंच, जर्मन तर सोडाच, भारतीय भाषांबाबतही कमालीची अनास्था. अनोळखी बाबींबाबत साहजिकच मनात एक प्रकारची तटस्थता निर्माण होते. त्यामुळे अनेकदा त्या त्या विषयांची सगळी पार्श्वभूमीही मांडावी लागायची. त्यात काही प्रमाणात त्रुटीही राहिल्या असतील, नव्हे राहिल्याच; पण एकुणात विषय समोर जाण्यास त्यांचा हातभार लागला, असे मानायला हरकत नसावी. 

शिवाय त्या घटनांचा आपल्या वातावरणाशी, आपल्या घटनांशी संबंध जोडण्याचाही प्रयत्न केला. उदा. १२ जून २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘पेट(वि)त्याचे घर असावे शेजारी...’ हा लेख केरळमधील कन्नड भाषकांबाबत केरळ सरकारने उचललेल्या पावलांबाबत होता. त्यात मी लिहिले होते, ‘आता यात महाराष्ट्राने करण्यासारखे काय आहे? तर काहीच नाही. पश्चिम घाटाचा पट्टा आणि अरबी समुद्र यांनीच महाराष्ट्र व केरळला जोडलेले आहे. एरव्ही दोन्ही राज्यांत भले मोठे अंतर आहे. फक्त स्वभाषेसाठी आग्रह धरणाऱ्या मल्याळम लोकांचे अभिनंदन करण्याला काय हरकत आहे? ज्याचे जळते त्यालाच कळते म्हणतात, त्याप्रमाणे आपल्या सीमाभागातील मराठी भाषकांच्या वेदनांची चुणूक त्यांनी या निमित्ताने कन्नडिगांना दाखवली. त्यातून त्यांनी काही धडा घेतला तर बरे, अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या’ आहेच! दुसरे म्हणजे मराठी बोलणाऱ्यांचा उपहास करून त्यांना इंग्रजी किंवा हिंदीच बोलायला भाग पाडणाऱ्या मराठी लोकांनीही त्यातून काही शिकल्यास बरे होईल. ‘केरळमधील विद्यार्थ्यांसाठी मल्याळम शिकणे फक्त आणखी एक भाषा शिकणे नव्हे. हे संस्कृती शिकून घेणे आणि अमर्याद संधीची दारे उघडणे आहे,’ असे राज्याचे शिक्षणमंत्री सी. रवींद्रनाथ विधानसभेत म्हणाले. हेच महाराष्ट्रात मराठीबाबत कधी ऐकू येणार?’

काही ठिकाणी चांगले, सकारात्मक आणि विधायक उपक्रम राबवण्यात येत होते. त्यांच्याबाबतही, एरव्ही आपल्याकडे सहसा न येणारी, माहिती देऊन मराठीतही ते प्रयोग राबवण्याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. उदा. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झालेला गुजरातमधील मातृभाषा अभियानाबाबतचा लेख. ‘मातृभाषा हा दिवस पाळण्याचा विषय नसून, तो एक जगण्याचा दिवस आहे, याचे भान ठेवले जाताना दिसत नाही. तसे भान ठेवणारी एक चळवळ उभी राहिली आहे गुजरातमध्ये. आपण ज्या समाजाला केवळ व्यापारकेंद्रित आणि व्यवहारी म्हणतो त्या समाजात,’ असे त्यात म्हटले होते आणि या अभियानातील उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली होती. 

अशा पद्धतीने तमिळनाडूतील तिरुक्कुरलपासून रोबोटनी स्वतःची भाषा विकसित केल्यामुळे फेसबुकला सोडाव्या लागलेल्या कृत्रित बुद्धिमतेच्या प्रयोगापर्यंत; भाषिक वर्चस्वातून साम्राज्य उभारू पाहणाऱ्या चीन सरकारच्या प्रयत्नांपासून इंग्रजीच्या बोजड स्वरूपाला फाटा देऊन सोपी इंग्रजी आणू पाहणाऱ्या चळवळीपर्यंत; मराठीच्या विविध रूपांची वाढ करून उपयोजित मराठीचा स्वतंत्र अभ्यास करण्यापासून, इंटरनेटमुळे भाषेला मिळणाऱ्या नवनवीन वळणांबाबत आणि त्यातून भाषेच्या होणाऱ्या वाढीपर्यंत; थायलंडमधील संस्कृतच्या पंडित असलेल्या राजकुमारी महाचक्री सिरिन्धोर्न यांच्यापासून, ‘अभिनेता म्हणून ओळखला जाण्यापेक्षा तमिळन (तमिळ व्यक्ती) म्हणून ओळखले जाण्यात मला जास्त अभिमान आहे. तमिळन म्हणून मरायला मला आवडेल,’ असे म्हणणाऱ्या ‘बाहुबली’तील कट्टप्पा उर्फ सत्यराजपर्यंत; लोकमान्य टिळकांचे तमिळनाडूतील खंदे अनुयायी महाकवी सुब्रह्मण्य भारती यांच्यापासून ते संस्कृतला राष्ट्रभाषा करण्याचा आग्रह धरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक विषय या सदरातून हाताळले. 

एकूणात हा सर्व प्रवास सुखावणारा होता, समाधान देणारा होता. पाण्यात पडले की पोहायला येते म्हणतात तसे किंवा ‘यथा यथा हि पुरुषः शास्त्रं समधिगच्छति। तथा तथा विजानाति विज्ञानं चास्य रोचते,’ या न्यायाने वरचेवर अनेक विषय कळत गेले. जाणीव वाढत गेली. 

भारतीय भाषा सक्षम आहेत, समर्थ आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांना उज्ज्वल भवितव्य आहे, ही माझी मूळ भूमिका होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही भूमिका घेऊनच मी लिहीत गेलो. सुदैवाने म्हणा अथवा योगायोगाने म्हणा, परंतु या भूमिकेला साजेशा घटना घडत गेल्या, माहितीचे तुकडे जमत गेले आणि त्या प्रतिपादनाला बळ येत गेले. 

सदर सुरू झाले ते २०१७मधील गुढीपाडव्याला आणि आता ते एक टप्पा पूर्ण करत आहे ते दिवाळीत, हा एक अवचित योगायोग म्हणायला पाहिजे. या अडीच वर्षांच्या काळात सुमारे १५० लेख लिहिता आले. त्याबद्दल ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे संपादक अनिकेत कोनकर आणि व्यवस्थापन यांचा मी आभारी आहे. संकेतस्थळाच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊन इथे थांबतो!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@didichyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZSGCF
Similar Posts
भाषेचे जगणे व्हावे! भाषा हा सोहळ्यांचा नाही, तर जगण्याचा विषय आहे. अन् हे फक्त साहित्यातील एक अलंकारिक वाक्य किंवा प्रेरक सुविचार नाही. याला भक्कम शास्त्रीय आधार आहे. ‘दुसरी भाषा शिकणे म्हणजे काही गोष्टींसाठी नवीन शब्द शिकणे असे नसून, गोष्टींबद्दल विचार करण्याचे दुसरे मार्ग शिकणे होय,’ असे भाषातज्ज्ञ म्हणतात... विचारमंथन करणारा विशेष लेख
बाजारपतित न झालेल्यांनी करावयाची पर्वा! भारतीय भाषांपुढील खरे आव्हान इंग्रजीचे आहे. बहुतेक भाषांमधील वृत्तपत्रांमध्ये किंवा माध्यमांत महिन्यातून एखादा तरी लेख त्या-त्या भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करणारा असतो. इंग्रजीच्या हत्तीला प्रत्येक आंधळा आपापल्या पद्धतीने पाहतोय आणि त्याचा दोष मात्र कोणावर तरी टाकायचा म्हणून हिंदीला झोडपतोय, असे हे चित्र आहे
कळते, पण वळत नाही! जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी, जगाच्या बाजारात उभे राहण्यासाठी, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी वगैरे कारणांनी इंग्रजीचा ध्यास घेतला जातो; मात्र त्या जागतिकीकरणाचा प्रवाह तर उलटाच आहे. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंगसारख्या कंपन्या देशी भाषांना पुढे आणण्यासाठी विविध साधने उपलब्ध करून देत आहेत. भाषांचा
चौथी, पाचवी नव्हे; भाषा एकच...पैशाची! गुगल असिस्टंट आता हिंदी व मराठीसह आठ भाषांमध्ये वापरता येणार असल्याचे गुगलने नुकतेच जाहीर केले. अॅलेक्सा हे आपले उपकरण हिंदी व हिंग्लिशमध्ये संभाषण करू शकेल, असे अॅमेझॉनने जाहीर केले. भारताची बाजारपेठ काबीज करायची असेल, तर बाजारपेठेची भाषा बोलायला पाहिजे, हे इंगित या कंपन्यांना पुरते कळून चुकले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language